Jafrabad electric shock youth death
जाफराबाद : जाफराबाद शहरातील आंबेडकर चौक परिसरात पाण्याची टाकी साफ करताना करंट लागल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. ८) दुपारी घडली.
मृत तरुणाचे नाव सुरज साईदास हिवाळे (वय १८) असे असून, तो जाफराबादचा रहिवासी आहे. दुसऱ्या कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी जालना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आंबेडकर चौकातील ‘ग्रीन अक्वा वॉटर फिल्टर’ कंपनीतील पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी दोघे तरुण उतरले होते. स्वच्छतेच्या दरम्यान टाकीत करंट उतरल्याने सुरज हिवाळे यांना तीव्र झटका बसला आणि तो बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार खाली उतरला असता, त्यालाही करंट लागला. या घटनेत सुरज हिवाळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि टाकी कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.