जालना : ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीने आणि पर्यवेक्षीय कामकाजासह महत्त्वाचे तांत्रिक सहाय्यभूत ठरणाऱ्या जालना आणि जाफराबाद पंचायत समितींचा कारभार सध्या प्रभारींच्या भरवशावर चालू आहे. या दोन पंचायत समित्यांचा कारभार पाहणाऱ्या एका अधिकाऱ्यावर पुन्हा तिसऱ्या विभागाचा पदभार असल्यामुळे त्यांची तारेवरची कसरत होत असून, यामुळे महत्त्वाच्या विकास कामांना स्पीड ब्रेकर लागले असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जालना पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप पवार यांच्याकडे जालना पंचायत समितीचा कारभार होता. यावेळी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचा पदभार राजपूत यांच्याकडे होता. राजपूत यांची बदली झाल्याने त्यांचा अतिरिक्त पदभार संदीप पवार यांच्याकडे आला. मात्र, काही महिन्यांतच जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पवार यांच्यावर घरकुल, एमआरईजीस आदी कामांत भ्रष्टाचाराचा केल्याचा आरोप आमदार अर्जुन खोतकर यांनी विधीमंडळात केला होता. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली.
चौकशी दरम्यान पवार हे दीर्घ रजेवर गेले. परिणामी, त्यांच्याकडे असलेला जालना पंचायत समितीचा कारभार स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्याकडे सोपवण्यात आला. तर जिल्हा परिषद पंचायत विभागाचा कारभार भोकरदनचे गट विकास अधिकारी डॉ. वेणीकर यांच्याकडे सोपविण्यात आला. सध्या लिंबाजी बारगिरे यांच्याकडे जालना पंचायत समिती, जाफराबाद पंचायत समिती आणि स्वच्छ भारत मिशन आदी तीन विभागांचा कारभार आहे. यामुळे हा कारभार हाकताना त्यांची दमछाक होताना दिसून येत आहे.
भोकरदनचे गट विकास अधिकारी वेणीकर यांच्याकडे जिल्हा परिषद पंचायत विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आल्याने त्यांनाही भोकरदन पंचायत समितीचा पूर्ण वेळ कारभार पाहणे अवघड होत आहे. यामुळे जालना आणि जाफराबाद पंचायत समिती अंतर्गत असलेल्या घरकुल योजनेसह इतर कामे विकासकामे रखडली आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र चिड निर्माण होत आहे.
समाजकल्याणचा कारभार घोळवे यांच्याकडे
जालना पंचायत समिती येथे सहायक गट विकास अधिकारी पदावर कार्यरत असलेले रमेश घोळवे यांच्याकडे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. शिवाय, त्यांच्याकडे ग्राम विकास प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पदाचा देखील अतिरिक्त कारभार आहे. यामुळे ही कामे करताना अधिकाऱ्यांना तारेवची कसरत करावी लागत आहे.
मंगळवारपासून एसबीएमचा कारभार सुरू
स्वच्छ भारत मिशनचा नियमित पदभार लिंबाजी बारगिरे यांच्याकडे आहे. मात्र, येथील कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी मानधन न मिळाल्याने बेमुदत संपावर होते. त्यामुळे सोमवारपर्यंत कार्यालयाला टाळे लागलेले दिसून आले. अखेर वरिष्ठस्तरावरून मानधनाचा तोडगा काढण्यात आल्याने कंत्राटी कर्मचारी मंगळवारी कार्यालयात हजर झाले. दैनंदिन कामकाजाला सुरुवात झाली.
जालना, जाफराबाद पंचायत समितींचा कारभार लिंबाजी बारगिरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. समाजकल्याण विभागाचा कारभार रमेश घोळवे तर पंचायत विभागाचा कारभार वेणीकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. एसआयआर प्रक्रिया झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यानंतर अधिकारी पूर्ण क्षमतेने प्राप्त होतील.राजेंद्र तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.