Jafrabad Fake Death Insurance Fraud
जाफराबाद : कर्जबाजारीपणातून सुटका मिळविणे, वैयक्तिक अडचणींपासून मुक्तता मिळविणे आणि विम्याची रक्कम हडप करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचत मित्राचा खून करून त्याचा मृतदेह कारमध्ये ठेवून अपघाताचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार जाफराबाद तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
३१ मे २०२६ रोजी सकाळी जाफराबाद-चिखली मार्गावर एका अल्टो कारचा अपघात होऊन वाहनाला आग लागल्याची आणि त्यामध्ये एक व्यक्ती जळून मृत झाल्याची माहिती डायल ११२ वर प्राप्त झाली होती. माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक माहितीनुसार जळालेला मृतदेह नितीन प्रभाकर गवळी याचा असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान मात्र संपूर्ण घटनाक्रमाला वेगळेच वळण मिळाले. पोलिस तपासात नितीन प्रभाकर गवळी याने अमित राजू फुलारे आणि आकाश सुधाकर गवळी यांच्या मदतीने कट रचल्याचे निष्पन्न झाले. विविध कर्जांपासून मुक्तता मिळविणे, नाशिक येथील एका महिलेबाबतच्या वैयक्तिक अडचणींपासून सुटका करून घेणे आणि विमा रकमेचा लाभ मिळविणे, या उद्देशाने त्यांनी संदीप चौहान याचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले.
खून केल्यानंतर संदीप चौहान याचा मृतदेह अल्टो कारमध्ये ठेवून वाहनाला अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला. कार पेटल्याने त्यामध्ये नितीन गवळीचा मृत्यू झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, मृत व्यक्तीची शंभर टक्के ओळख निश्चित करण्यासाठी संदीप चौहान आणि त्याच्या पालकांचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी निकम यांच्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(१), ६२(२)(अ), २३८(अ)(ब) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तेगबिर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार करीत आहेत.