भोकरदन : नांजावाडी शिवारातील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात अटक केलेले आरोपी केशव गावंडे आणि सतीश सोनवणे यांना भोकरदन न्यायालयात हजर करण्यात आले. प्रमुख न्यायाधीश मयुरेश काळे यांनी सुनावणीदरम्यान दोघांना ३ डिसेंबरपर्यंत म्हणजे सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, हा अवैध गर्भपात ज्या ठिकाणी करण्यात येत होता. नांजावाडी परिसरातील गवळीवाडी येथील शेतातील बकरीपालन गोठ्यासंदर्भातही नवीन माहिती समोर आली आहे. या गोठ्याचे मालक समाधान सोरमारे यांनाही सहआरोपी करण्यात आले असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक योगेश उबाळे यांनी सांगितले.
या प्रकरणात गर्भलिंग निदान व गर्भपातासाठी आणलेल्या तीन महिला साक्षीदार झाल्या आहेत. त्यांना २६ नोव्हेंबर रोजी रात्री जालना येथील महिला रुग्णालयात दाखल करून त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी पूर्ण झाल्यानंतर २७ नोव्हेंबरला त्यांना घरी पाठवण्यात आले. या संवेदनशील प्रकरणाचा तपास भोकरदन पोलीस ठाण्याऐवजी जालना येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, अशी माहितीही पोलिस सूत्रांकडून मिळते.