बदनापूर (जालना) : भागवत पवार
तालुक्यात सोमवारी (दि.15) मध्यरात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने मात्रेवाडी, हलदोला, शेलगाव, मांजरगाव, धोपटेश्वर, पिरसावंगी, ढोकसाळ, रोषणगाव या गावांमध्ये शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक भागात गंभीर परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील देव पिंपळगाव येथे शारदाबाई काशिनाथ श्रीसुंदर (७५) या पुराच्या पाण्यात वाहुन गेल्या.
या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुक्यातील देवपिंपळगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून. सोमवारी (दि.15) रात्री घराबाहेर झोपलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचा प्रकार घडला. यावेळी गावकऱ्यांनी काल दिवसभर शोधमोहीम राबवली, मात्र उशिरापर्यंत त्या महिलेचा शोध लागला नव्हता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच नागरिकांनी प्रशासनाकडे मदत व तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बदनापूरचे तहसीलदार हेमंत तायडे यांनी नुकसानग्रस्त भागाची शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पिकांच्या नुकसानीचा आढावा घेत पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे. महसूल विभागाचे अधिकारी आणि तलाठी यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत नुकसानीचा शासनाकडे अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात जाऊन पाहणी केली असून पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा सुरू आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी गावागावात जाऊन नुकसानीची माहिती घेत आहेत. पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे पाठविण्यात येतील.हेमंत तायडे, तहसीलदार