जालना : जालना जिल्ह्यात सोमवारी (दि.15) रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले व ओढयांना पूर आल्याने अनेक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा बसला आहे. भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथे समाधान बाबुराव साबळे हा इसम वीज पडून मयत झाला.
बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे शारदाबाई काशिनाथ श्रीसुंदर (७५) या पुराच्या पाण्यात वाहुन गेल्या. घनसावंगी तालुक्यातील श्रीकृष्णनगर येथील बाबु तुळीराम चव्हाण यांच्या अंगावर वीज पडल्याने ते गंभीर जखमी झाले. पावसामुळे खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थीक फटका बसला आहे. अनेक गावांत जुन्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.
जालना जिल्ह्यात हवामान विभागाच्यावतीने यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी रात्रीपासुन पावसाने जोर धरला. अनेक गावात ढगफुटी सदृष्य पाऊस पडल्याने नद्या, नाले, ओढ्यांना मोठे पुर आल्याचे पहावयास मिळाले. अंबड तालुक्यातील कोडगावात जाणारा पुल पुराच्या पाण्यामुळे खचला असुन या पुलावरुन पुराचे पाणी वाहात आहे. मुसा भद्रायणी व गल्हाटी नदीला पूर आल्यामुळे दाढेगाव, घुंगर्डे हादगाव, शहापुर परिसरात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. गल्हाटी नदीला पुर आल्यामुळे हसनापुर येथे शेत वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तारकेश्वर नदीला पुर आल्यामुळे डावरगाव ते कडेगाव दरम्यान नदीवरील पुल खचला आहे. जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद- चिखली मार्गावर धामणा नदीला आलेल्या पुरामुळे हा मार्ग काही काळ बंद झाला होता.
बदनापुर तालुक्यातील मात्रेवाडी येथे पिकात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना तालुक्यातील हातवण गावात पुराने वेढा दिल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. खनेपुरी येथे वीज पडुन एक बैल ठार झाला. घनसावंगी तालुक्यात वीज पडुन दैठणा व उकडगाव येथे दोन म्हशी मयत झाल्या. यावल पिंप्री येथे छबु राठोड यांचा बैल पुराच्या पाण्यात बाहुन गेला. घनसावंगी येथे पाझर तलाव फुटल्याने एक म्हैस पुराच्या पाण्यात वाहुन गेली.
निम्न दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
परतूर: निम्न दुधना धरण व्यवस्थापनाने १६ सप्टेंबर रोजी धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या निम्न दुधना धरणाचे सोळा दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले आहेत.
यातून २७,१०४ क्युसेक (७६७.४९ क्युसेक) पाणी सोडले जात आहे. दुपारी तीन वाजेपासून विसर्ग आणखी वाढवला आहे. त्यात पाण्याची आवक पाहता, दुपारी ३ वाजता आणखी काही दरवाजे ०.५० मीटरवरून ०.६० मीटरपर्यंत उघडण्यात आले आहेत. यामुळे अतिरिक्त ३,३१० क्युसेक (९३.७३ क्युसेक) पाणी सोडले जात आहे. यामुळे दुधना नदीपात्रातील एकूण पाण्याचा विसर्ग ३०,४१४ क्युसेक (८६१.२२ क्युसेक) इतका विसर्ग झाला आहे.
धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, निम्न दुधना धरण व्यवस्थापनाने दुधना नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यात १५ ते १९ सप्टेंबर या चार दिवसांत यलो अलर्टचा इशारा देण्यात आल्याने नागरिक व शेतकरी धास्तावले आहेत. सोमवारी रात्री पडलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असतानाच आता येणाऱ्या तीन दिवसांत काय होणार या भीतीने नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत.
जिल्ह्यात जालना तालुका ८९, सेवली ७१.५, रामनगर ६६.५, पाचनवडगाव ६६.५, जाफराबाद तालुक्यात वरुड ७८.३, अंबड तालुक्यात १२६, गोंदी ११७.२, वडीगोंद्री ११४, सुखापुरी ११४.५, घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी ९१.५, कुंभार पिंपळगाव ९१.५, आंतरवाली ९१.५, जांबसमर्थ ७२ मीमी पावसाची नोंद झाली आहे.