आष्टी : परतूर तालुक्यातील गंगासावंगी येथील जिल्हा परिषद शाळेत गोदावरी नदीला आलेल्या पुराचे शिरले.  (छाया हारुन कच्छी)
जालना

Jalna Heavy Rain : गोदावरीला पूर, गोळेगावला पाण्याचा वेढा 1700 गावकऱ्यांचे स्थलांतर

गोळेगाव, गंगासावंगी, सावरगाव, चांगतपुरी या गावांना पुराच्या पाण्याने वेढा

पुढारी वृत्तसेवा

आष्टी (जालना) : पैठण येथील नाथसागर धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने परतूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गोळेगाव, गंगासावंगी, सावरगाव, चांगतपुरी या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. गोळेगावात पुराचे पाणी शिरल्याने १७०० गावकऱ्यांचे सुरक्षीत स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. आष्टी- माजलगाव शेगाव - पंढरपूर दिंडी मार्गावरील गंगा सावंगी येथील पूल पाण्याखाली गेला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरले असून सावरगावचाही संपर्क तुटला आहे.

परतूर तालुक्यातील आष्टीसह गोदावरी नदीकाठावरील गावात गोदा-वरीला आलेला पूर व पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. आमदार बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांनी गोळेगाव येथील पूरपरिस्थितीची पाहणी केली. आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे मध्यरात्रीपासून घटनास्थळी सहकाऱ्यांसह हजर आहेत.

परतूर तालुक्यात गोदावरी नदीच्या पराचा फटका गोळेगावला बसत असून मध्यरात्री १२ च्या सुमारास पाणी वाढू लागल्याने व गावाला पुराचा वेढा पडण्याचा धोका निर्माण होताच ग्रामपंचायतने ध्वनी प्रक्षेपण करून गावकऱ्यांना बाहेर निघण्याच्या सूचना देण्यात आल्या. घटनास्थळी आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी पोहचताच गावचे सरपंच उध्दव डोळस ग्रामसेवक शेख शफी व इतरांनी जवळपास १७०० गावकऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले असून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सावरगावचा संपर्क तुटला

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे सावरगाव येथील गौतमी नदीला पूर आल्याने व नदीवर असलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने. आष्टी सावरगावचा संपर्क गेल्या काही दिवसांपासून वारंवार तटत आहे

एकरुखा-देवहिवरा गावात बहिर नदीला आलेल्या पुराने संकट

  • घनसावंगी तालुक्यातील एकरुखा व देवहिवरा परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर गंभीर संकट ओढवले आहे. सोमवार (२२) रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, मका तसेच भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

  • बहिर नदीला आलेल्या पुरामुळे आप्पासाहेब कांतीलाल बर्डे यांच्या यांच्या शेतातून नदी वाहू लागल्याने सोयाबीन व अनेक पिकांचे नुकसान झाले. एकरुखा-देवहिवरा परिसरातील नागरिकांचे

  • दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. नदी-नाले तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांची जनावरे, घरातील धान्यसाठा व दैनंदिन जीवनावर मोठे संकट ओढवले आहे. हातातोंडाशी आलेला घास पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

  • माजी मंत्री राजेश टोपे यांनी पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अच्युत गोरे यांना संपर्क करून परिस्थितीबाबत माहिती घेतली. नदीकाठच्या एकरुखा, देवहिवर, तनवाडी, दहिगाण, खालापुरी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन टोपे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT