जालना ः शहरातील मोती बाग वळण रस्त्यावर वाढत्या तापमानामुळे रस्त्यावर शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळत आहे  (छायाः किरण खानापुरे )
जालना

Jalna temperature alert : 16 व 17 रोजी उष्णतेचा यलो अलर्ट

तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

जालना ः जालना जिल्ह्यात 16 व 17 एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता मुंबई येथील कुलाबा येथील भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ होताना दिसत आहे.तापमानात वाढ होत असल्याने वर्दळीच्या रस्त्यावरही दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 16 व 17 एप्रिल रोजी तापमानात लक्षणीय वाढ होऊन ते 42 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदविले जाण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार असून उष्माघाताचा धोका वाढू शकतो.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते सायंकाळी 4 दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुरेसे पाणी पिणे, हलके व सैल कपडे परिधान करणे, डोके झाकण्यासाठी टोपी किंवा रुमाल वापरणे तसेच थेट सूर्यप्रकाशापासून दूर राहणे आवश्यक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकरी, मजूर आणि बाहेरील काम करणाऱ्या व्यक्तींनी कामाचे वेळापत्रक सकाळी किंवा सायंकाळी ठेवावे, असेही प्रशासनाने सुचविले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले असून एप्रिलमध्ये असे तर मे मध्ये कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT