Jalna Accident News 
जालना

Jalna Accident : दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; दोघे ठार, महिलेसह तिघे गंभीर

परतूर-आष्टी रस्त्यावरील दैठणा पाटीजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

परतूर : परतूर-आष्टी रस्त्यावरील दैठणा पाटीजवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोन चिमुरड्यांसह एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, परतूर येथील सन्मित्र कॉलनीतील रहिवासी सचिन नंदकुमार आढे (वय २२) हा तरुण दुचाकीवरून श्रीष्टी येथून परतूरकडे येत होता. याचवेळी परतवाडी तांडा येथील मिथुन विनोद आढे (वय २५) हे आपली पत्नी, १० वर्षांचा मुलगा आणि ४ वर्षांच्या मुलीसह मोटारसायकलवर परतूरहून श्रीष्टीकडे जात होते. दैठणा पाटीच्या समोर दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली.

हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. अपघातात डोक्याला व शरीराला गंभीर मार लागल्याने सचिन आढे याचा जागीच मृत्यू झाला. तर मिथुन आढे, त्यांची पत्नी व दोन्ही मुले गंभीर जखमी झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन सर्व जखमींना परतूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचार केल्यानंतर मिथुन आढे आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालन्याला हलवण्यात आले. मात्र, जालन्याला जात असताना वाटेतच मिथुन यांचा मृत्यू झाला. सध्या त्यांच्या पत्नी आणि दोन्ही चिमुरड्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.घटनेनंतर परतूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सचिन आढे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के. जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्याम गायके, रानोजी पांढरे, विनोद वाघमारे आणि विलास जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT