Jalna Groundwater level in the district increased by one meter!
जालना, पुढारी वृत्तसेवा: भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यातील भूजल पातळी एक मीटरने वाढली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा १३९ टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याने ही वाढ झाली असल्याचे दिसून येते.
दरम्यान, सततच्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. असे असले तरी भूगर्भातील पाणी पातळी वाढल्यामुळे दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पाणीपातळी वाढल्यामुळे कायम दुष्काळी भागांमध्येही भूजल स्तर सुधारला असून, आगामी काळात पाणीटंचाई कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी १ मीटरने वाढून सध्या २.५४ मीटर इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ११० निरीक्षण विहिरींवर आधारित या अभ्यासात, ८६ विहिरींच्या पाणीपातळीत वाढ दिसून आली, तर २० विहिरींच्या पातळीत घट नोंदवली गेली. जिल्ह्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून केलेल्या जलसंधारणाच्या कामांचा फायदा भूजल पातळी वाढीसाठी झाला आगाह सप्टेंबरअखेर झालेले सर्वेक्षण दर्शवते की, ऑक्टोबर महिन्यातही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे जिल्हाभरातील नदी नाले, तुडूंब भरून वाहिले. यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.
परिणामी जिल्ह्यातील ६७ पैकी ६१ प्रकल्प तुडुंब भरले असून, उपयुक्त पाणीसाठा ८३.९३ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरल्याने गावागावांतील पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.
सातही प्रकल्प भरले जालना तालुक्यातील कल्याण गिरजा, कल्याण मध्यम प्रकल्प भरले आहेत. बदनापूर तालुक्यातील अपर दुधना, भोकरदन तालुक्यातील जुई, धामणा प्रकल्प भरले आहेत. जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा व अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पही तुडुंब भरला आहे. हे प्रकल्प भरल्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.