संघपाल वाहूळकर
जालना : शहरातील मोठ्या व्यावसायिक आस्थापना, इमारती आणि मालमत्तांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ५५०० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या मालमत्तांचे फायर सेफ्टी ऑडिट करण्याचे निर्देश देऊनही कारवाई रेंगाळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचेच फायर ऑडिट अद्याप झालेले नसल्याची बाब समोर आली आहे.
१३ जुलै रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ५५०० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या मालमत्तांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून संबंधित मालमत्ताधारकांवर कार्यवाही सुरू करण्यात आली. काही मालमत्ताधारकांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. मात्र, दुसरीकडे महापालिकेची स्वतःची प्रशासकीय इमारतच फायर ऑडिटच्या प्रतीक्षेत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दिवसेंदिवस मोठ्या व्यावसायिक इमारती, आस्थापना आणि विविध प्रकारच्या बांधकामांमध्ये वाढ होत आहे. अशा ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे की नाही, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, अग्निशमन उपकरणे आणि इतर आवश्यक सुरक्षा उपायांची उपलब्धता याची तपासणी करणे महत्त्वाचे ठरते.
याच पार्श्वभूमीवर ५५०० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या मालमत्तांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, आदेशानंतरही सर्व संबंधित मालमत्तांचे ऑडिट पूर्ण झाले आहे का, याबाबत स्पष्टता नसल्याने प्रशासनाच्या कार्यवाहीचा वेग चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, १३ जुलैच्या आदेशानंतर ५५०० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या किती मालमत्तांचे फायर ऑडिट झाले, किती मालमत्तांना नोटिसा देण्यात आल्या आणि किती मालमत्तांवर प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली, याची माहिती प्रशासनाने जाहीर करण्याची मागणी होत आहे.
आधी स्वतःच्या इमारतीचे ऑडिट करा!
मोठ्या मालमत्ताधारकांना फायर ऑडिटसाठी नोटिसा देणाऱ्या महापालिका प्रशासनाने सर्वप्रथम स्वतःच्या प्रशासकीय इमारतीची अग्निसुरक्षा तपासणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने प्रशासकीय इमारतीचे फायर ऑडिट तातडीने करून त्यातील त्रुटी दूर करण्याची गरज आहे. या संदर्भात सर्व साधारण सभेत देखील अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले होते.
सभेत प्रश्न उपस्थित; अधिकाऱ्यांची कबुली
महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत प्रशासकीय इमारतीच्या फायर ऑडिटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी अग्निशमन अधिकारी श्री. पानपट्टे यांनी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे फायर ऑडिट झाले नसल्याची कबुली दिली होती. तसेच हे काम लवकरच हाती घेण्यात येईल, असे सभागृहाला सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष फायर ऑडिट पूर्ण झाले नसल्याने प्रशासनाच्या आश्वासनाच्या अंमलबजावणीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.