Paradh School Inspection
पारध बु. : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे १०–११ लाखांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या ‘महाराजा गेट’च्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत 'दै. पुढारी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आहे. समग्र शिक्षा अभियान, भोकरदन गटसाधन केंद्राच्या अभियंता योगिता वाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पारध येथील ग्रामसेवक गजानन उंबरकर यांनीही पाहणी करून शाळेसाठी नवीन गेट तातडीने बसविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
'दै. पुढारी' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात गेट दोनदा कोसळणे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच शाळा परिसरात मोकाट जनावरांचा वावर आणि अपूर्ण कामांमुळे निर्माण झालेल्या धोक्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला होता. या वृत्तानंतर संबंधित यंत्रणा तातडीने सक्रिय झाली.
पाहणीदरम्यान गेटची सद्यस्थिती, वॉल कंपाऊंड तसेच परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नवीन व सुरक्षित गेट लवकरात लवकर बसविण्याचे आश्वासन ग्रामसेवक गजानन उंबरकर यांनी दिले.
या प्रकरणाची प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, दिलेल्या आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पारध येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ‘महाराजा गेट’ची प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान गेटच्या कॉलमचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. संबंधित ठेकेदाराने तांत्रिक मानकांनुसार दर्जेदार व सुरक्षित पद्धतीने काम पूर्ण करावे, तसेच आवश्यक त्या सुधारणा तातडीने करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.- योगिता वाडेकर (अभियंता, समग्र शिक्षा अभियान, भोकरदन गटसाधन केंद्र)
जिल्हा परिषद शाळेतील प्रलंबित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाळेच्या परिसरातील पेव्हर ब्लॉकचे अपूर्ण काम येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सध्या असलेले गेट काढण्यात येणार असून, त्याऐवजी मजबूत व दर्जेदार स्लाइडिंग गेट बसविण्यात येईल. ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या असून, कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.- गजानन उंबरकर (ग्रामसेवक, ग्रामपंचायत पारध बु.)