Crime News pudhari photo
जालना

Jalna Illegal Sand Mining : दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारा हायवा पकडला

तालुका पोलिसांकडून १० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

जालना : दुधना नदीच्या पात्रातून विनापरवाना व बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या एका हायवा ट्रकवर जालना तालुका पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत १० लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक आणि ३० हजार रुपयांची ६ ब्रास वाळू असा एकूण १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हायवा चालक व मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे पथक हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. यादरम्यान, दुधनाकाळेगाव येथील नदीपात्रातून वाळूची अवैध विक्री व वाहतूक करण्यासाठी हायवा भरला जात असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांसह दुधनाकाळेगाव ते गोलापांगरी रस्त्यावर सापळा रचला.

मंगळवार, दि. २० रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास समोरून 'पाटलाची वाघीण' आणि 'यशवंती' नाव असलेला संशयित टाटा कंपनीचा हायवा (क्र.एचएच ०३, सीपी ८९४१) येताना दिसला. पोलिसांनी हायवा थांबवून चालकाकडे चौकशी केली असता, त्याने आपले नाव भरत बद्रीनाथ कुटे (वय- रोहणवाडी, ता. जि. जालना) असे सांगितले.

वाहनाची पाहणी केली असता त्यात ६ ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. वाळू वाहतुकीबाबत रॉयल्टी किंवा परवान्याची मागणी केली असता चालकाकडे कोणताही परवाना नव्हता. दुधना नदीपात्रातून अवैध उपसा करून वाळू चोरट्या मार्गाने विक्रीसाठी नेली जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक आणि ३० हजार रुपयांची वाळू असा एकूण १०,३०,००० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. या प्रकरणी पोलिस अंमलदार किशोर अंकुशराव जाधव यांच्या तक्रारीवरून आरोपी भरत बद्रीनाथ कुटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये जालना तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार संदीप बेराड करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT