जालना : दिव्यांगाकडे बघण्याचा सामाजिक दृष्टीकोन बदलण्याची गरज असून महानगर पालिकेच्या वतीने जालना शहरातील दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही महापौर वंदना मगरे यांनी येथे दिली.
अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक भवनाच्या सभागृहात आयोजित दिव्यांग मार्गदर्शन मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. उपमहापौर राजेश राऊत हे अध्यक्षस्थानी होते. शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णु पाचफुले, गणेश मगर, कार्याध्यक्ष भाऊसाहेब दसपुते, दीपाली शेंडगे आदींची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना महापौर मगरे पुढे म्हणाल्या की, दिव्यांग हे कुटुंबातील सदस्य मंडळींना आव्हान वाटते, समाजाचा दिव्यांगाकडे बघण्याचा दृष्टीकोनही वेगळा आहे. दिव्यांगावर मात करून आकाशाला गवसणी घालण्याचे विक्रम दिव्यांगानी केले आहेत. यावेळी दिव्यांग बांधवाची उपस्थिती होती.
सन्मान दिला जाईल
अध्यक्षीय समारोप करताना राजेश राऊत म्हणाले की, दिव्यांग हे परिस्थितीशी झगडत असतात, जालना महानगर पालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या घरकुलाचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. महानगर पालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांना सन्मान दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.