जालना : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या शासनाच्या अनुदानात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने निर्णायक कारवाई करत 3 तलाठ्यांसह फरार 5 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना प्रथमवर्ग न्यायालय, अंबड यांनी 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
चौकशी समितीच्या अहवालानुसार 240 गावांमध्ये एकूण 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणात आतापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नुकतीच अटक करण्यात आलेली आरोपींची नावे सुनील रामकृष्ण सोरमारे, बप्पासाहेब रखमाजी भुसारे, रामेश्वर नाना जाधव, वैभव विश्वंभर आडगावकर व विजय निवृत्ती भांडवले अशी आहेत.
आरोपी अटक टाळण्यासाठी मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहत होते. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने सातत्यपूर्ण तांत्रिक व गोपनीय तपास करत त्यांचा शोध घेऊन अटक केली. उर्वरित फरार आरोपी व एजंटांचा शोध सुरू आहे.