भोकरदन: तालुक्यातील राजुर गणपती येथील युवक विशाल गुलाबराव इंगळे यांनी त्याच्या शेजारी राहणाऱ्या गोपाळ नारायण सांगळे व वैशाली विलास रोकडे या दोघांचे अनैतिक संबंध बघितले होते. त्याचा बदला म्हणून शेजाऱ्यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून विशाल इंगळे यांनी गुरुवारी (दि. 18 डिसेंबर) दुपारी राजुर येथील राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
या प्रकरणी मयताची आई यमुनाबाई गुलाबराव इंगळे, अंगणवाडी सेविका, उंबरखेड तालुका भोकरदन हल्ली मुक्काम विष्णुपुरी नांदेड यांनी हसनाबाद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजुर पोलीस चौकी येथे दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही शेजारी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात यमुनाबाई इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचे कुटुंब मूळचे उंबरखेड तालुका भोकरदन येथील असून माझा मुलगा विशाल इंगळे हा त्याची पत्नी व मुलांसह राजूर येथे राहण्यासाठी होता. व मी सध्या विष्णुपुरी नांदेड येथे राहत आहे.
माझ्या मुलाच्या शेजारी राहणाऱ्या गोपाळ सांगळे व वैशाली रोकडे दोघेही राहणार पोखरी (ता-जाफराबाद हल्ली मुक्काम राजुर) यांचे अनैतिक संबंध असून ते माझा मुलगा विशाल याने बघितल्यामुळे हे दोन्हीही शेजारी त्याला सतत त्रास देऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने विषारी औषध प्राशन करून गुरुवारी (दि. 18 डिसेंबर) राहत्या घरी आत्महत्या केली असून या आत्महत्येला हे वरील दोन्ही शेजारी जबाबदार आहेत. त्यामुळे हसनाबाद पोलिसांनी या फिर्यादीनुसार वरील दोन्ही आरोपींनी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक तायडे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.