Jalna Crime : रुईत भरदिवसा घरफोडी; रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास 
जालना

Jalna Crime : रुईत भरदिवसा घरफोडी; रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास

दुपारी एकच्या सुमारास चोरी उघडकीस; फिंगरप्रिंट पथकाकडून घटनास्थळी ठसे संकलित, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

सुखापुरी : -अंबड तालुक्यातील तीर्थपुरी–सुखापुरी रस्त्यावरील रुई येथे मंगळवारी भरदिवसा घरफोडीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राजू भानुदास लहामगे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे ९० हजार रुपये रोख रकमेसह अंदाजे एक ते सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

घरातील सदस्य बाहेर गेले असताना चोरट्यांनी घराला लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि रोख रकमेसह दागिन्यांवर डल्ला मारला. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यालगत घरफोडी झाल्याने रुई परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जालना येथून फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून घरातील विविध ठिकाणांहून चोरट्यांच्या बोटांचे ठसे संकलित केले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, याच परिसरातील रहिवासी सतीश तारगे यांच्या घराचेही कुलूप तोडण्यात आल्याचे समोर आले. मात्र, त्या घरातून काही चोरीला गेले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरट्यांनी परिसरातील आणखी घरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पूर्वीच्या चोरीच्या घटनांचे काय?

रुई परिसरात यापूर्वीही चोरीच्या अनेक घटना घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही घटनांचा तपास अद्याप पूर्ण झाला नसल्याने “मागील चोरीच्या घटनांचा तपास कुठपर्यंत पोहोचला?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जुन्या घटनांचा तपास लागला नसताना पुन्हा भरदिवसा घरफोडी झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

रस्त्यावरून सतत नागरिकांची ये-जा असतानाही घरफोडी होणे ही बाब गंभीर मानली जात आहे. चोरट्यांनी घराची पाहणी करून नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केली असावी, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल लोकेशन, संशयित व्यक्तींची हालचाल तसेच यापूर्वीच्या चोरीच्या घटनांशी या घटनेचा संबंध आहे का, याचा तपास होणे गरजेचे आहे.

भरदिवसा घरफोडी होत असेल तर रात्रीच्या सुरक्षेचे काय? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत असून, रुई परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी आणि मागील चोरीच्या घटनांचा तपास तातडीने पूर्ण करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT