भोकरदन : भोकरदन तालुक्यातील कोपर्डा शिवारामध्ये बेकायदेशीररीत्या मानवी जीवितास हानिकारक असलेल्या ओल्या गांजाच्या झाडांची लागवड करून संगोपन करणाऱ्या एका आरोपीवर भोकरदन पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश दशरथ शेळके यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भोकरदन पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी मौजे कोपर्डा शिवारातील शेत गट क्रमांक १०१ मधील शेतात अचानक छापा टाकला.
या कारवाईदरम्यान आरोपी मधुकर किसन पाबळे (वय ४२ वर्ष, रा. कोपर्डा, ता. भोकरदन, जि. जालना) याच्या मालकीच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरून पुढीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला पांढऱ्या गोणीमध्ये भरलेली एकूण ७.२२० किलोग्रॅम वजनाची, अंदाजे ३,६१,००० रुपये किमतीची गांजाची २ झाडे, गांजाच्या झाडाची ओलसर माती (किंमत अंदाजे २०० रुपये) आणि लागवड केलेल्या शेतातील माती (किंमत अंदाजे २०० रुपये).असा एकूण ३,६१,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीने स्वतःच्या शेतात बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची लागवड केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५६३/२०२६, कलम २० (ब) (ii), (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने हे करत आहेत.