Jalna Crime News pudhari photo
जालना

Jalna Crime News : घरासाठी १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ

सासरच्या चार जणांवर घनसावंगी पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Jalna Crime News : Physical-mental harassment of married woman for demanding 10 lakhs for house

जालना, पुढारी वृत्तसेवाः पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींनी आधार देण्याऐवजी विवाहितेचा अमानुष छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. माहेरवरून घरासाठी १० लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावत विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला व तिच्या चिमुकल्या मुलीला मारहाण करून घराबाहेर हाकलून देणाऱ्या सासरच्या चार जणांविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विद्या नागेश इंगळे (वय २९, सध्या रा. नागोबाची वाडी, ता. घनसावंगी, जि. जालना, मूळ रा. विठ्ठल रुक्मिणी सोसायटी, मोरे वस्ती, चिखली, ता. हवेली, जि. पुणे) यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी विद्या यांचा विवाह २८ एप्रिल २०१८ रोजी धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे नागोबाची वाडी येथे नागेश जालिंधर इंगळे यांच्याशी झाला होता. संसाराची गाडी सुरळीत सुरू असतानाच, २४ मे २०२२ रोजी पती नागेश जालिंधर इंगळे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांचे निधन झाले. मात्र, पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींची मानसिकता बदलली.

सासरा जालिंधर भगवान इंगळे, सासू रतन जालिंधर इंगळे, नणंद पुनम राहुल पोळ आणि नणंदेचा पती राहुल संदीपान पोळ (सर्व रा. विठ्ठल रुक्मिणी सोसायटी, मोरे वस्ती, चिखली, ता. हवेली, जि. पुणे) यांनी विद्या यांना सतत त्रास देण्यास सुरुवात केली.

पीडितेची पोलिसांत धाव

अखेर कंटाळून पीडित महिला आपल्या माहेरी घनसावंगी तालुक्यातील नागोबाची वाडी येथे निघून आली आणि तिने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सासरच्या चारही जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३(५), ३५२ आणि ८५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संजय जाधव हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT