Jalna Crime News: Farmer assaulted for opposing sand extraction
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिंपळगाव सुळ शिवारातील पूर्णा नदीपात्रातून जेसीबीच्या साह्याने बेकायदेशीर वाळू काढण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एका शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ करत काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केदारखेडा (ता. भोकरदन) येथील रहिवासी कृष्णा गंभीरराव जाधव (३३, व्यवसाय शेती) हे २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पिंपळगाव सूळ शिवारातील
शेत गट क्र. २९ मधील पूर्णा नदीपात्रात असलेल्या आपल्या विहिरीतील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे आरोपी नकुल अण्णा तांबडे हा जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करत असल्याचे त्यांना दिसले.
शेतकरी कृष्णा जाधव यांनी नकुल तांबडे यास नदीपात्रातून वाळू न काढण्याबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने आरोपीने त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने सहदेव अण्णा तांबडे आणि कृष्णा मधुकर ठोंबरे यांना तेथे बोलावून घेतले.
यावेळी आरोपी सहदेव तांबडे याने हातातील काठीने (दांड्याने) मारहाण करून दुखापत केली, तर कृष्णा ठोंबरे याने चापटबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शेतकरी जाधव यांच्या तक्रारीवरून सहदेव अण्णा तांबडे, नकुल अण्णा तांबडे (दोघे रा. मेरखेडा, ता. भोकरदन) आणि कृष्णा मधुकर ठोंबरे (रा. जवळखेडा ठोंबरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.