Murder Pudhari
जालना

Jalana News | शेत रस्त्याच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून

११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ८ जून रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन: तडेगाव येथे २७ मे रोजी शेत रस्ता आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या जीवघेण्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले काका रामचंद्र मगनसिंग काकरवाल (वय ४७) यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ८ जून रोजी सकाळी ६ वाजता जालना येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. या घटनेमुळे आता या प्रकरणात पाच आरोपींविरुद्ध खुनाचा (३०२) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

२७ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तडेगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. रामचंद्र काकरवाल यांना त्यांचा पुतण्या राहुल छगन काकरवाल, प्रवीण काकरवाल, विठ्ठल सिंघल, किसन सिंघल आणि हिम्मत सिंघल अशा पाच जणांनी "तू जास्त मस्तीत आला आहेस" असे म्हणत शेत रस्त्याच्या व जुन्या वादावरून बेदम मारहाण केली. यावेळी संशयितांनी लोखंडी गज, कुऱ्हाडीचा दांडा, चाकू आणि लाठी-काठीचा वापर केला होता. या हल्ल्यात रामचंद्र काकरवाल हे गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर त्यांनी स्वतः भोकरदन पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध तक्रार दिली होती. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जालन्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ८ जून रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

नातेवाईकांचा संताप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

रामचंद्र काकरवाल यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावात आणि नातेवाईकांमध्ये तीव्र संताप पसरला. रामचंद्र यांच्या भावाने व इतर नातेवाईकांनी पोलिसांवर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप केला आहे. "पोलिसांनी फक्त एकाच आरोपीला अटक केली आणि बाकीच्यांना मोकळे सोडले. इतर आरोपींना बाहेर राहण्यासाठी पोलिसांनी आर्थिक देवाणघेवाण केली," असा खळबळजनक आरोप नातेवाईकांनी केला. सर्व उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. जालन्यातील जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करण्यात आले, परंतु पोलीस आणि नातेवाईकांमध्ये ताळमेळ न बसल्याने मृतदेह बराच वेळ रुग्णालयातच पडून होता.

पाच जणांवर खुनाचा गुन्हा, दोघे गजाआड

याप्रकरणी २७ मे रोजी भोकरदन पोलीस ठाण्यात केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल होता. मात्र, रामचंद्र यांच्या मृत्यूनंतर आता त्याचे रूपांतर खुनाच्या गुन्ह्यात करण्यात आले आहे. अटक झालेल्या आरोपींमध्ये राहुल छगन काकरवाल (पुतण्या - रा. तडेगाव वाडी) , छगन काकरवाल, प्रवीण काकरवाल (रा. तडेगाव वाडी) अशी नावे आहेत. तर फरार असलेल्यांमध्ये विठ्ठल सिंघल (रा. नळणी), किसन सिंघल (रा. नळणी) आणि हिम्मत सिंघल (रा. नळणी) अशी आहेत. यातील एका आरोपीला घटनेच्या वेळीच अटक करण्यात आली होती, तर दुसऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या अन्य तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार सोमनाथ मंडलिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT