Jalna Crime | Pudhari
जालना

Jalna Crime | जांबुवंत देवस्थान जत्रेत दोन महिलांचे मंगळसूत्र लंपास

एक संशयित महिला चोर रंगेहात सापडली,

पुढारी वृत्तसेवा

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथील प्रसिद्ध जांबुवंत महाराज देवस्थान येथे भरलेल्या जत्रेत चोरीच्या घटनांनी भाविकांमध्ये खळबळ उडाली. सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास झालेल्या या प्रकारात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले.

दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली असताना चोरट्यांनी महिलांना लक्ष्य करत ही चोरी केली. या घटनेमुळे जत्रेत उपस्थित महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, एका सतर्क महिलेच्या धाडसामुळे एक संशयित महिला रंगेहात पकडण्यात आली. संबंधित महिलेने चोरी करताना संशयितास पकडताच आरडाओरडा केला. यामुळे उपस्थितांनी तत्काळ धाव घेत संशयित महिलेला ताब्यात घेतले व पोलिसांच्या स्वाधीन केले.

या संपूर्ण प्रकाराचे चित्रण देवस्थान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पकडलेल्या महिलेसोबत आणखी काही पुरुष साथीदार असल्याची बाब प्राथमिक चौकशी व फुटेजमधून समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घटनेनंतर काही काळ देवस्थान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाढत्या सोन्याच्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अशा चोरीच्या घटना वाढत असल्याची चर्चा असून महिलांना लक्ष्य केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, जत्रा, यात्रा व मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी जोर धरत आहे. देवस्थान परिसरात किमान एक पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलिस कर्मचारी कायम तैनात ठेवावेत, अशी मागणी भाविक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT