AI Image- हातपाय बांधून मोटरसायकलवरुन १३ वर्षीय मुलाचे अपहरण, आष्टी बसस्थानक परिसरातील थरारक प्रसंग्र!  
जालना

Jalna Crime | हातपाय बांधून मोटरसायकलवरुन १३ वर्षीय मुलाचे अपहरण, आष्टी बसस्थानक परिसरातील थरारक प्रसंग्र!

प्रसंगावधान राखत मुलाची स्वतःहून सुटका, घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

आष्टी प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील बसस्थानक परिसरातून एका १३ वर्षीय शाळकरी मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. मात्र, मुलाने प्रसंगावधान राखून हातपाय बांधलेली दोरी सोडवत घनसावंगी शहराच्या दिशेने धावत जाऊन नागरिकांच्या मदतीने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधल्याने तो सुखरूप घरी परतला.

या घटनेमुळे आष्टी परिसरातील पालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही महिन्यांपूर्वी अंबड घनसावंगी इतर गावांतून मुलं हरवल्याची घटना घडलेली आहे त्यांचे अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही व त्यांत ही घटना घडली यावरून असे दिसते की मुले पळवणारी टोळी सक्रिय आहे अशी नागरिकां मध्ये चर्चा आहे.

काल आष्टी येथील आठवडी बाजार व गणपती महालक्ष्मीच्या मुळे बाजारात गर्दी होती त्यामुळे नागरिक आपापल्या व्यवसायात व्यस्त होते.आदिनाथ रामलिंग सोमवंशी (वय १३) हा विद्यार्थी आष्टी येथील शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी तो बसस्थानक परिसरात असताना लघुशंकेसाठी काही अंतरावर गेला होता. त्यावेळी एका अनोळखी इसमाने त्याला जेवणाचे हॉटेल कुठे आहे, अशी विचारणा केली. मुलाने सांगितले की मोंढा भागात चांगले जेवण मिळते, असे सांगितले. त्यानंतर संबंधित इसमाने हॉटेलचा पत्ता दाखविण्याची विनंती करून मुलाला मोटारसायकलवर बसविले.

मुलाच्या म्हणण्यानुसार, संबंधित इसमाने त्याला मोंढा परिसराकडे नेल्यानंतर त्याच्या तोंडावर रुमाल लावला. त्यानंतर मुलगा बेशुद्ध झाल्याचे त्याने सांगितले. पुढे त्याचे हातपाय बांधून मोटारसायकलवरून घनसावंगीच्या दिशेने नेण्यात आले.

घनसावंगी शहराजवळ संबंधित इसमाने मोटारसायकल थांबवून लघुशंकेसाठी काही वेळ थांबला. त्यावेळी मुलाला शुद्ध आली. त्याने प्रसंगावधान राखत हातपाय बांधलेली दोरी सोडवली आणि तेथून धावत घनसावंगी शहराच्या दिशेने गेला. काही नागरिकांच्या मदतीने त्याने मोबाईलवरून आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली.घटनेची माहिती मिळताच मुलाचे वडील रामलिंग सोमवंशी व नातेवाईक तातडीने घनसावंगी येथे पोहोचले आणि मुलाला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर काही नागरिकांसह ते घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, घटना आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगण्यात आल्याने कुटुंबीयांनी सांगितले.

दरम्यान, दि. १९ सप्टेंबर रोजी अपहरणाचा प्रयत्न झालेला मुलगा, त्याचे वडील तसेच काही नागरिक व व्यापारी आष्टी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक के जी पवार यांच्याकडे घटनेबाबत अर्ज देऊन संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आदिनाथचे वडील हे आष्टी येथे पानटपरीचा छोटा व्यवसाय करतात. त्यांना दोन मुले असून आदिनाथ हा इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. भरदिवसा बसस्थानक परिसरातून शाळकरी मुलाला अनोळखी अज्ञात व्यक्तीने मोटारसायकलवरून घेऊन गेल्याच्या या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेत ये-जा करणाऱ्या मुलांकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे, अनोळखी व्यक्तींसोबत जाऊ नये तसेच कोणत्याही कारणासाठी अनोळखी व्यक्तीच्या वाहनावर बसू नये, अशी जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. बसस्थानक, बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान, या घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, मुलाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित अनोळखी व्यक्तीचा शोध घेणे तसेच घटनेची सत्यता तपासून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT