Crime News pudhari photo
जालना

Jalna Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोघांना ३ वर्षे सक्तमजुरी

जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; १७ हजार नुकसानभरपाई

पुढारी वृत्तसेवा

जालना : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी दोन आरोपींना दोषी ठरवत जालना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय-४ ने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने मुख्य आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी, ११ हजार रुपये दंड, तर दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. दुसऱ्या आरोपीस सहा महिने सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश कुपेष मोरे यांनी सोमवार, दि. २० रोजी हा निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी शेख मोहसीन शेख वसीम (वय ३२) व शेख रहीम शेख वसीम (वय ३३, रा. पारध बुद्रुक, ता. भोकरदन, जि. जालना) यांना दोषी ठरविण्यात आले.

प्रकरणानुसार, २७ जून २०२० रोजी रात्री पीडित अल्पवयीन मुलगी वाड्यात फोनवर बोलत असताना मुख्य आरोपीने तिचा विनयभंग केला. त्यानंतर पीडितेने ही घटना घरी सांगितल्याचा राग मनात धरून २८ जून २०२० रोजी दोन्ही आरोपींनी तिला शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासानंतर आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम ३२३, ५०६, ३५४ तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत कलम ८ व १२ अन्वये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. वर्षा मुकीम यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यादरम्यान पीडित मुलगी, तिची आई, पंच साक्षीदार, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. शाळेच्या दाखल्यासह इतर पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले.

एकाला ११ हजार रुपये दंड

न्यायालयाने दंडापोटी वसूल होणाऱ्या रकमेतून १७ हजार पीडित मुलीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचेही आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पी. एस. उबाळे यांनी काम पाहिले असून, न्यायालयीन कामकाजात सेशन कोर्ट पैरवी म्‍हणून बीटचे पोलिस अंमलदार यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT