जालना ः सिटू संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी पदाधिकारी. pudhari photo
जालना

‌Jalna construction workers protest : ’लाल बावटा‌’चे जिल्हा कचेरीसमोर निदर्शने

पोलिसांत अडकलेले साहित्य तत्काळ वाटप करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

जालना : महाराष्ट्र राज्य इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने वाटप करण्यात येणारे साहित्य परतूर पोलिसांनी चुकीच्या माहितीच्या आधारे अडवून ठेवल्याचा आरोप करत, सोमवार, 27 रोजी सिटू संलग्न लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कामगारांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

दरम्यान, परतूर येथील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी मार्च महिन्यात साहित्यासाठी थम व्हेरिफिकेशन (अंगठ्याचे ठसे) पूर्ण केले होते. मात्र, त्यावेळी गोडाऊनमध्ये साहित्य उपलब्ध नव्हते. त्यानंतर जालना येथील गोडाऊनमधून साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर, कामगारांनी स्वखर्चाने 5,500 रुपये भाडे देऊन वाहन ठरवले आणि साहित्य परतूरला आणले.

मात्र, साहित्य परतूरला पोहोचताच काही व्यक्तींनी सरकारी कामगार अधिकाऱ्यांची दिशाभूल करून चुकीची माहिती दिली. आणि आमदार बबन लोणीकर यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी साहित्याचे वाहन अडवून पोलिस स्टेशनला जमा केले. इतकेच नव्हे तर, कामगार नेते मारोती खंदारे व सरिता खंदारे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी निवासी जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा करण्यात आली त्यावेळी उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे यांनी सरकारी कामगार अधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाला नाही.

आंदोलनात यांचा सहभाग

या आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते कॉ. अण्णा सावंत, सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. मधुकर मोकळे, जिल्हा सचिव ॲड. अनिल मिसाळ, शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव भगवान कोळे, रवी भदरगे बाबासाहेब पाटोळे, दिगंबर मोरे, अशोक साळवे, परवीन शेख, शेख महेमूद, शेख फरीदा, रमेश घुगे, किरण खंडागळे रामेश्वर वाव्हल, विशाल सौंदर्य, कल्पना खंडागळे, सुनीता मगर आदी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT