Jalna Accident News 
जालना

Jalna Accident : मिरची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आयटीआय कॉलेज गेटजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

जाफराबाद : मिरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने पाठिमागून दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१३) सायंकाळी ७ च्या सुमारास भोकरदन रोडवरील आयटीआय कॉलेज गेटजवळ घडली. यशवंत श्रीराम पेंढारकर (वय ५९) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जाफराबाद येथील यशवंत पेंढारकर हे दुचाकी क्रं. (एमएच २१ यू ८२५८) वरून सायंकाळी सहाच्या सुमारास अष्टविनायक नगर येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना आयटीआय कॉलेज गेटजवळ मिरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने (डब्ल्यूबी २५ झेड ३१७४) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी काही अंतरापर्यंत घसरत गेली. अपघातात यशवंत पेंढारकर गंभीर जखमी झाले. उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वसुदेव पवार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे.

पंधरा दिवसांत दुसरा बळी

जाफराबाद-भोकरदन मार्गावर मिरची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या अपघातांची मालिका सुरू असल्याचे या घटनेनंतर पुन्हा समोर आले आहे. गेल्या पंधरा दिवसांत मिरची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकचा हा दुसरा बळी आहे. यापूर्वी जवखेडा फाट्याजवळ मिरची वाहतूक करणाऱ्या ट्रकने तीनचाकी ॲपेला धडक दिली होती. या अपघातात ॲपे चालक संदीप जगताप यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आयटीआय कॉलेज गेटजवळ झालेल्या अपघातात यशवंत पेंढारकर यांचा मृत्यू झाल्याने या मार्गावरील वाढत्या मिरची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघातामुळे जाफराबाद-भोकरदन रोडवर काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT