घनसावंगी : तक्रारदाराच्या आईच्या नावावरील जमिनीचा मोजणी नकाशा उपलब्ध करून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भूअभिलेख विभागातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले. घनसावंगी फाटा येथील हॉटेल इंडिया येथे ही कारवाई करण्यात आली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बोलेगाव येथील तक्रारदाराच्या आईच्या नावावर असलेल्या जमिनीच्या मोजणीसाठी काही महिन्यांपूर्वी अर्ज करण्यात आला होता. मोजणी प्रक्रिया पूर्ण करून नकाशा देण्यासाठी उपअधीक्षक, भूअभिलेख कार्यालय वणसावंगी येथे कार्यरत असलेले पदभूकरमापक नेमणूक कर्मचारी अनंत मधुकर पाटील (वय ३०) यांनी तक्रारदाराकडे १२ हजार रुपयांची मागणी केली होती.
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला. त्यानुसार सोमवारी घनसावंगी फाटा येथील हॉटेल इंडिया येथे आरोपीने तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी हा मूळचा रेंगटा (ता. गेवराई, जि. बीड) येथील रहिवासी असल्याची माहिती एसीबीने दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बालू जाधवर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आले आहे.