Blood Shortage  pudhari photo
जालना

Jalna Blood Shortage : जालना जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा

दररोज दीडशे पिशव्यांची गरज; नातेवाईकांची धावाधाव

पुढारी वृत्तसेवा

जालना: जालना शहरासह जिल्ह्यातील विविध रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रक्त मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे दीडशे रक्तपिशव्यांची आवश्यकता असताना रक्तसाठा कमी पडत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून रक्तदान शिबिरांचे आयोजन झाले नसल्याने रक्तसाठ्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यात रक्तासोबतच प्लेटलेट्सचाही तुटवडा जाणवत असल्याने गरजू रुग्णांच्या अडचणी वाढल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता सामाजिक संस्था, महाविद्यालये, औद्योगिक संस्था तसेच मोठ्या उद्योजकांनी पुढाकार घेऊन ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे.

रक्तपेढ्या रुग्णांना सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असतात; मात्र रक्तसाठा टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. गरज पडल्यास रुग्णांच्या नातेवाईकांनीही स्वेच्छेने रक्तदान करून सहकार्य करावे. रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून एखाद्याला जीवनदान देण्याची संधी आहे.

जालना जिल्हा शासकीय रुग्णालयातही सर्वच रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. जिल्हा रुग्णालयाची दररोजची गरज ४ ते ५ रक्त पिशव्यांची आहे. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभुमीवर घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे नुकत्याच झालेल्या कॅम्पमधे २४ बॅग रक्तसाठा झाला.३० नोव्हेंबर, २ डिसेंबर व ५ डिसेंबर रोजी रक्तदानासाठी शिबीर आयोजित करण्यात येत आहेत.

सध्या रक्ताचा आणि प्लेटलेट चा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत असून सामाजिक संस्था, महाविद्यालय,मोठे मोठे कारखानदार यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे. वेळ प्रसंगी रक्त नसेल तर नातेवाईकांनी बदली रक्तासाठी तयारी दाखवावी. रक्तपेढी ही प्रत्येक वेळेस प्रत्येक रुगांसाठी उपलब्ध असते पण नातेवाईकांनीही रक्तपेढी सोबत उभे राहून सहकार्य करावे.
गणेश. डी.चौधरी संस्थापक अध्यक्ष-गणेश चौधरी ब्लड डोनर ग्रुप जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT