जालनाः आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीसह आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी. pudhari photo
जालना

Jalna farmer fraud : शेतकऱ्यांची १५ लाखांची फसवणूक

आर्थिक गुन्हेची कारवाई; आरोपीला पाच दिवसांची कोठडी

पुढारी वृत्तसेवा

जालना : बदनापूर परिसरातील शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला जालना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समृद्धी महामार्गावर जेरबंद केले. सागर चिमण काकड असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेवराई बाजार फाटा येथील जगदंबा ड्रायव्हर ढाबा परिसरात शेडमध्ये आरोपींनी 'राधे-राधे ट्रेडिंग कंपनी' या नावाने दुकान सुरू केले होते. या माध्यमातून व्यापाऱ्यांनी परिसरातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर १७ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत फिर्यादी प्रल्हाद बाबुराव टकले (रा. केळीगव्हाण, ता. बदनापूर) यांच्यासह इतर ३१ शेतकऱ्यांकडून १५ रुपये प्रतिकिलो दराने एकूण १५ लाख ४२ हजार ८८५ रुपये किमतीचे टोमॅटो खरेदी केले.

मात्र, टोमॅटो खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे न देता आरोपींनी आर्थिक फसवणूक केली. शेतकऱ्यांना बँक खाते बंद असल्याचे सांगतले. पैसे 'उद्या-परवा एकत्र पैसे देतो' असे आश्वासन देऊन आरोपींनी वेळकाढूपणा केला. त्यानंतर सर्व माल वेगवेगळ्या वाहनांतून माल भरून नेला आणि २८ सप्टेंबर रोजी दुकान बंद करून पलायन केले. त्यानंतर मोबाईल बंद करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी फिर्यादी प्रल्हाद टकले यांच्या तक्रारीवरून २ ऑक्टोबर ६ रोजी बदनापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासा दरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी सागर चिमण काकड याचा शोध घेण्यात आला. आरोपी नाशिक येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो तेथून निघून गेल्याचे समजले. त्यानंतर पुन्हा तांत्रिक विश्लेषण करून आरोपी समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी संशयित वाहनाचा अंदाज घेऊन पाठलाग करुन समृध्दी महामार्गावर २६ नोव्हेंबर रोजी रात्री आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य आरोपीला अटक केली. शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) आरोपीला न्यायालयात हजर केले .

फरार आरोपींचा शोध सुरू

या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. या कारवाईमुळे टोमॅटो विक्री करूनही पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजवीरसिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT