जालना: शहरातील आझाद मैदान परिसरात गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमण प्रकरणी अखेर महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. आझाद मैदानावरील अंकुश कोचिंग क्लासेसचे संचालक तथा अतिक्रमणधारक अंकुश रामराव सोनवणे यांच्याविरोधात सोमवार, दि. 20 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या अतिक्रमणाविरोधात शेख शकील यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी तथा आयुक्त महोदया यांनी संबंधित अतिक्रमण तत्काळ हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, वारंवार नोटिसा व सूचनांनंतरही अतिक्रमणधारकाने कोणतीही कार्यवाही केली नाही.
अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम व मालमत्ता अधीक्षक राहुल देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देत 7 जानेवारीपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. मात्र दिलेली मुदत संपूनही अतिक्रमण कायम राहिल्याने प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला.
माननीय जिल्हाधिकारी, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त नंदा गायकवाड व सहायक उपायुक्त सुप्रिया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख बी. सी. राठोड यांच्या आदेशानुसार सहायक पथकप्रमुख तथा अनधिकृत बांधकाम निरीक्षक शामसन कसबे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधितावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, शहरातील सार्वजनिक जागा व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. ज्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांनी तत्काळ अतिक्रमण हटवावे, अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.