जालना : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शनिवार, दि. 9 रोजी जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
ॲड. सदावर्ते हे जालन्यात आले असता, त्यांच्या ताफ्याला अडवून मनसे कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सदावर्ते हाय हाय..., गुणरत्ने सदावर्ते यांचा निषेध असो, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते हे जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. दरम्यान, जालना-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. यावेळी निषेधार्थ घोषणा देत आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर शाई फेकली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत सदावर्ते यांना सुरक्षित स्थळी हलवले.
शाईफेक होताच उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, गुणरत्न सदावर्ते सातत्याने या भूमिकेला विरोध करत आहेत. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी ॲड. सदावर्तेंच्या गाडीवर शाई फेकली, असल्याचे समोर आले आहे.सदावर्ते यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मनसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.