परतूर; पुढारी वृत्तसेवा : रस्त्याच्या बाजूने पायी जात असलेल्या ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला भरधाव दुचाकीने उडवल्याने 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. परतूर शहरातील तहसील कार्यालय समोर मुख्य रस्त्यावर मंगळवारी (दि. ३) दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सोपान गंगाधर शेंडगे (वय ७५, रा.श्रीष्टी ता.परतूर) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर दुचाकी चालक घटना स्थळावरून फरार झाला. प्रत्यक्षदर्शींनी गंभीर जखमी सोपान शेंडगे यांना परतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
शविच्छेदन करण्यासाठी मृतदेह दुपारी साडेतीन वाजेपासून ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला होता. मात्र डॉ.संतोष काळे रुग्णालयात हजर नसल्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत मृतदेह रुग्णालयातच होता. डॉक्टर कर्तव्यावर हजर नसल्याने नातेवाईकांनी मोठी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. डॉ.संतोष काळे यांना नातेवाईक पोलीस आणि खुद्द वैद्यकीय अधीक्षक दुर्गावाड यांनी अनेक वेळा संपर्क करूनही संपर्क झाला नाही. शेवटी वैद्यकीय अधीक्षक डॉ.एल.पी.दुर्गावाड यांनी स्वतः सायंकाळी सात वाजता शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.