Police raid sand smuggling
अंबड : अंबड पोलीस स्टेशन हद्दीत वाळू तस्करी करणाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव शिवारातील दूधना नदी पात्रात आज दि.07 मे रोजी रात्री 02.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक मोठा हायवा, एक लहान हायला व एक जे.सी.बी. पकडुन गुन्हा नोंद करण्यात आला. यामुळे वाळु माफियांचे धाबे दणाणले असून येणाऱ्या काळात अशाच कारवाया करणार असल्याचे संकेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले यांनी या कारवाई निमित्त दिले आहे.
अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील दुधना नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती गुप्त खबऱ्या व्दारे अंबड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अमोल गुरले यांना मिळाली. तेव्हा गुरले यांनी पोलीस पथकासह चक्क एका बैलगाडीत बसुन दुधना नदीच्या पात्राकडे धाव घेतली.तेव्हा नदी पात्रात वाळुचे दोन हायवा आणि एक जे.सी.बी. दुधना पात्रात अवैध रित्या उत्खनन उद्देशाने आढळुन आले. तेव्हा पोलीसांनी दोन हायला, एक जे.सी.बी. असा एकुण 55 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अंबड पोलीसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अमोल गुरले, पोलीस उपनिरीक्षक बी.बी.नरवडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक पाटील,पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल भिसे, भानुसे, अरुण मुंढे आदींनी पार पाडली.
नेहमीच वाळूमाफिया विरुद्ध पोलीस प्रशासन कारवाई करत असतो परंतु पोलिसांची चाहूल लागण्यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये वाळूमाफिया हे फरार होतात मुद्देमाल ही मिळत नाही. त्यामुळे काहीतरी वेगळी योजना वापरावी असं गुरले यांनी यावेळी ठरविले. गुन्हेगाराला पकडायचे असेल तर त्याला त्याच्याच योजनेद्वारे किंवा त्याच्याच मानसिकतेद्वारे आपण पकडू शकतो हे पोलीसी मानसशास्त्र गुरले यांनी नेमकं हेरले आहे किंवा त्यांना चांगलेच अवगत झालेले आहे. त्यामुळे या प्रकरणातही गुरले यांनी कोणत्याही पोलीस वाहनांचा वापर न करता चक्क बैलगाडी चा वापर केला . त्या हायवा मध्ये गुरले यांच्यासह पूर्ण पोलीस पथक हे बैलगाडी मध्ये बसून दुधना नदीच्या पात्रात दाखल झाले.
ही आलेली बैलगाडी शेतकऱ्यांची असावी असा समज या वाळू माफियांचा झाला आणि ते बिंनदीक्कतपणे वाळूचे उत्खनन करू लागले. वाळू माफियांना गाफिल ठेवत पोलीस पथकाने जागेवरच एक मोठा हायवा, एक छोटा हायवा व एक जेसीबी असा 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले. वाळु माफिया यांना गाफील ठेऊन गनिमी काव्या द्वारे केलेल्या कारवाईची चर्चा जालना जिल्ह्यात सुरू आहे.