Ambad Taluka Godavari River Farmers Protest Agriculture Issues
शहागड : अंबड तालुक्यातील गोंदी येथील गोंदेश्वर मंदिरा जवळील गोदावरी नदीत आज (दि. ९) दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. विविध मागण्यांसाठी ३० शेतकऱ्यांनी नदीच्या मध्यभागी खोल पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी नदीकाठावर ही मोठ्या संख्येने शेतकरी थांबले होते. त्यांनी प्रशासनाचा निषेध करत घोषणाबाजी केली. प्रशासनाने होडीसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, शेतकऱ्यांना बँकेचा व्हीके नंबर त्वरित उपलब्ध करून देऊन अनुदान रक्कम जमा करावी, KYC झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित अनुदान देण्यात यावे, २०२४ मधील पीक विमा वाटप करावे, ज्या शेतकऱ्यांनी सोलर साठी ऑनलाईन पेमेंट केलेले आहेत आणि त्यांचे सोलर रिजेक्ट केलेले आहेत. त्यांचे पैसे परत करावे, मागेल त्या शेतकऱ्यांना सोलर दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध करावी. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कार्यालयात नियमित हजर राहण्याबाबत आदेश काढावेत, पिकाच्या निकषाप्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज बँकांना वाटप करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढावेत, थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांना येणारी विविध योजनेची रक्कम अकाउंट होल्ड काढून रक्कम देण्यात यावी, शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारी डीपी- पोल- तारा या उपकरणाची महावितरणने तत्काळ दुरुस्ती करावी. शेतकऱ्यांना बियाणे आणि खते पेरणीसाठी उपलब्ध करून द्यावीत. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान विमा योजनेच्या माध्यमातून येणारी रक्कम मार्गी लावावी.
या निवेदनावर शरद सोळुंके, गजानन उगले, पांडुरंग गात, संभाजी मरकड, विनोद मरकड, कैलास सोळुंके, शेखर सोळुंके, अनिल मरकड, दत्तात्रय जाधव, गंगाधर जोशी, अर्जुन बनगे, भिवराज बनगे, शहाजी सोळुंके, अंगत मरकड, कृष्णा सोळुंके, विनोद सोळुंके आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.