Ambad Brother Death Case
अंबड : अंबड तालुक्यातील घुंगरडे हादगाव येथे लहान भावाने मोठ्या भावाचा झोपेतच कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना सोमवारी (दि. २६) मध्यरात्री घडली. मंगळवारी (दि. २७) सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तुकाराम जगन्नाथ काकडे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा लहान भाऊ रामेश्वर जगन्नाथ काकडे (वय २२) याला गोंदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गुरले हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर कुटुंबीयांकडे चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान पोलिसांचा संशय रामेश्वरवर बळावला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने मोठ्या भावाचा खून केल्याची कबुली दिली .
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तुकाराम हा दारू पिऊन आई-वडील आणि लहान भावाला सतत त्रास देत असे. त्यांच्याशी मारहाणही करत असे. या सततच्या त्रासातून हा खून झाल्याचे चौकशीदरम्यान समोर आल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
काकडे कुटुंबीयांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. गावालगत असलेल्या शेतातील घरात तुकाराम त्याच्या पत्नीसह राहत होता. तर गावातील घरात आई-वडील आणि लहान भाऊ रामेश्वर राहत होता. शेतीच्या कामानिमित्त रामेश्वर अधूनमधून शेतातील घरात मुक्कामाला जात असे. सोमवारी मध्यरात्री शेतातील घरात तुकाराम झोपलेला असताना त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी तुकारामचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गुरले यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलिस पुढील तपास करीत आहेत.