jalna agriculture loss government give 5 thousand to farmer
सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा : "मायबाप राजा, उधार झाला हाती भोपळा दिला !" अशी म्हणण्याची वेळ आज शेतकरी आणि शेतमजुरांवर आली आहे. दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून सरकारने गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला असला, तरी महागाई, दुष्काळ आणि आर्थिक विवंचनेत होरपळणाऱ्या कुटुंबांसाठी ही मदत पुरेशी ठरणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्न नाही, हाताला काम नाही आणि घरात पैशाची आवक नाही, अशा कुटुंबांनी दिवाळी साजरी करायची तरी कशी, हा खरा प्रश्न आहे.
अंबड तालुक्यासह सुखापुरी आणि रुई परिसरात यंदा पावसाअभावी शेतीची अवस्था बिकट झाली आहे. पिके संकटात सापडली असून, शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पन्न पडण्याची आशा धूसर झाली आहे. शेतीसाठी बियाणे, खते आणि औषधांवर खर्च केला; मात्र पावसाने दगा दिल्याने हा खर्च वसूल होण्याची शक्यताही कमी झाली आहे. दुसरीकडे शेतमजुरांना पुरेसा रोजगार मिळत नसल्याने त्यांच्या घरातील आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या सणासाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर झाली असली, तरी या रकमेतून नेमके काय-काय भागवायचे, असा प्रश्न कुटुंबांसमोर उभा आहे.
यंदाच्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात राबूनही उत्पन्नाची खात्री नाही, मजुरी करूनही कुटुंबाचा खर्च भागत नाही आणि कर्जाचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी दिवाळीपूर्वीची मदत दिलासा देणारी ठरू शकते; मात्र ती कायमस्वरूपी संकटावरचा उपाय ठरू शकत नाही.
सरकारने मदतीची घोषणा करण्याबरोबरच प्रत्यक्षात किती शेतकरी आणि शेतमजूर या मदतीसाठी पात्र आहेत, त्यांच्या खात्यात रक्कम कधी जमा होणार आणि दुष्काळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना पुढे कोणता आधार मिळणार, याबाबतही स्पष्टता देणे आवश्यक आहे.
दिवाळीचा आनंद हवा, पण त्यासाठी हातात पैसा नको का?
शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांना केवळ सणापुरती मदत नको, तर त्यांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न सुटण्यासाठी ठोस उपाययोजना हव्यात. रोजगार, शेतीला पाणी, पीक नुकसानीची भरपाई आणि कर्जाच्या ओझ्यातून दिलासा यांसारख्या उपायांची त्यांना गरज आहे.
पाच हजार रुपयांनी दिवाळीचा एखादा दिवा नक्कीच उजळेल; पण कर्ज, महागाई आणि दुष्काळाने अंधारलेल्या संसारात प्रकाश आणण्यासाठी एवढी मदत पुरेशी ठरणार का? सरकारने या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. दिवाळी साजरी करायची आहे ती केवळ नावापुरती नाही, तर मुलांच्या चेहऱ्यावर खरा आनंद पाहण्यासाठी. त्यांच्या या अपेक्षेकडे सरकारने केवळ मदतीची घोषणा म्हणून जगण्याच्या संघर्षाकडे पाहून निर्णय घेण्याची गरज आहे.
पाच हजारांत संसाराचा हिशेब कसा जुळणार?
दिवाळी आली की मुलांच्या चेहऱ्यावर नवीन कपड्यांचा आनंद दिसावा, घरात गोडधोड व्हावे आणि कुटुंबाने चार क्षण आनंदात घालवावेत, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मात्र, हातात पैसे नसतील तर या इच्छा केवळ स्वप्नच ठरतात.
दमछाक
चार व्यक्तींच्या कुटुंबाचा महिन्याचा किराणा खर्चच चार हजार रुपयांच्या पुढे जात असताना, उर्वरित गरजा भागवण्यासाठी पाच हजार रुपये पुरणार कसे ? दिवाळीचा सण साजरा करायचा, मुलांचे शिक्षण सुरू ठेवायचे, जनावरांना जगवायचे आणि डोक्यावर असलेले कर्ज फेडायचे, या सगळ्यांची सांगड घालताना सामान्य कुटुंबांची दमछाक होत आहे.