जालना

Jalna Accident | धक्कादायक! वाळू माफियांच्या हायवाखाली चिरडून तरुण शेतमजुराचा अंत; भोकरदनमध्ये तणाव

दोषींवर कारवाईच्या आश्वासनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार; हायवा चालक व मालक फरार

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवा ट्रकने ३० वर्षीय शेतमजुराला चिरडल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात कचरू पांडुरंग ढवळे या तरुणाचा मृत्यू झाला असून, घटनेनंतर हायवा चालक आणि मालक गाडीसह फरार झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ नातेवाईकांनी मृतदेह थेट सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कचरू पांडुरंग ढवळे (वय ३०) हे १४ मे रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास पायी शेतात जात होते. 'बांध' नदीच्या पुलावर पाठीमागून आलेल्या एका विनापरवाना वाळूने भरलेल्या हायवा ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत कचरू खाली पडल्यानंतर हायवाचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारादरम्यान सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

१५ मे रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास कचरू ढवळे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेसह भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयासमोर आणण्यात आला. जोपर्यंत वाळू माफियांवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणाव वाढला होता.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांनी आंदोलकांची भेट घेतली. संबंधित हायवा चालक व मालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर कचरू ढवळे यांच्या पार्थिवावर गव्हाण संगमेश्वर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयताचा भाऊ सोपान पांडुरंग ढवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात हायवा चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या हायवा मालकावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यानेच यापूर्वी राजूर येथे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून, परिसरातील अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT