जालना : जालन्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत आई-वडिलांसमोर एका ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.३१) दुपारी ४ वाजता जालना-मंठा रोडवरील रामनगर साखर कारखान्याजवळ घडली. घटनेनंतर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला.
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील ऊसतोड कामगारांचे एक कुटुंब मंठा रोडवरील साखर कारखान्यावर निघाले होते. ते रामनगर साखर कारखान्याच्या रस्त्याच्या कडेला थांबले असता त्यांच्या कुटुंबातील सात वर्षाचा चिमुकला अचानक रोडवर गेला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून वाहनासह पलायन केले. घटनेनंतर गंभीर जखमी चिमुकल्याला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबियांनी अनेक वाहनांना विनवण्या केल्या मात्र, कोणीही थांबले नाही. त्यानंतर चिमुकल्याला दुचाकीवरून जालन्यातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले पण वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर जालन्यातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून चिमुकल्याचा मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला. यावेळी कुटुंबियांनी रुग्णालयात केलेला आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने आणि रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात यांनी घाटे रुग्णालयामध्ये धाव घेऊन नातेवाईकांना सांत्वन केले.अज्ञात वाहनाचा शोध घेऊन पोलिसांनी वाहनधारकाला ताब्यात घ्यावे, अपघात घडला त्यावेळी साखर कारखान्याच्या प्रशासनाने कोणतीही मदत न केल्यामुळे बालकाच्या उपचारांमध्ये विलंब झाला. जर कारखाना प्रशासनाने लवकर मदत पुरवली असती तर कदाचित चिमुकल्याचा जीव वाचला असता, अशी खंत विजय लहाने व संदीप खरात व्यक्त केली.