संघपाल वाहूळकर
जालना : शेतकऱ्यांना शेतीला शाश्वत सिंचन सुविधा मिळावी, यासाठी राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीतील विदारक वास्तव समोर आले आहे. जालना जिल्ह्यात एकूण ४० हजार ७११ सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली असून, त्यावर आतापर्यंत तब्बल ४८४ कोटी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
मात्र, या प्रचंड खर्चाच्या पार्श्वभूमीवर ११ हजार ७२६ विहिरी अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत, तर १३ हजार ५२८ विहिरींना मंजुरी मिळूनही त्यावर अद्याप एक रुपयाही खर्च झालेला नाही. परिणामी, कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही हजारो बळीराजा सिंचनाच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहिला आहे.
भोकरदन तालुक्यात सर्वाधिक १० हजार ४६५ विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. दुसरीकडे, अपूर्ण विहिरींच्या यादीत अंबड तालुका २ हजार ६३४ विहिरींसह आघाडीवर असून, त्यापाठोपाठ भोकरदनमध्ये १ हजार ७९९ आणि जालना तालुक्यात १ हजार ६६५ विहिरींचे काम रखडलेले आहे.
चालू आर्थिक वर्षात मजुरीपोटी १७ कोटी ८९ लाख रुपये, तर साहित्यासाठी ६ कोटी ६१ लाख रुपये खर्च झाल्याचे अहवालात नमूद आहे. विशेष बाब म्हणजे, अपूर्ण विहिरींच्या साहित्यासाठी १६७ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असताना प्रत्यक्ष झालेला खर्च अत्यंत तुटपुंजा आहे. जाफराबाद तालुक्यात साहित्यावरील खर्च शून्य नोंदवला गेला असून, भोकरदनमध्ये अवघ्या ७.८६ लाख रुपयांवरच बोळवण झाली आहे.
एकीकडे १५ हजार ४५७ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, त्यावर ३०८ कोटी ९८ लाख रुपये खर्च झाले आहेत. तर दुसरीकडे नव्याने मंजूर झालेल्या १३ हजार ५२८ विहिरींसाठी ५२१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असताना, त्यावर अद्याप शून्य खर्च आहे.
निधीचे ढिसाळ नियोजन, साहित्य निधीचा तुटवडा आणि कामांची संथ गती यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तालुकानिहाय वास्तव
सर्वाधिक मंजुरी : भोकरदन तालुक्यात १०,४६५ विहिरींना मंजुरी
अपूर्ण विहिरींमध्ये आघाडी : अंबड तालुक्यात सर्वाधिक २,६३४ विहिरी अपूर्ण
इतर तालुक्यांतील अपूर्ण विहिरी : भोकरदनमध्ये १,७९९, तर जालना तालुक्यात १,६६५ विहिरी रखडलेल्या
साहित्य खर्चाची दैना : जाफराबाद तालुक्यात साहित्यावरील खर्च शून्य; भोकरदनमध्ये केवळ ७.८६ लाख रुपये खर्च