Jalna health campaign 2026 pudhari photo
जालना

Jalna health campaign 2026 : ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’;१२ लाख ४२ हजार नागरिकांची होणार आरोग्य तपासणी!

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’; २४२६ मनुष्यबळाच्या माध्यमातून १० डिसेंबरदरम्यान सात टप्प्यांत मोहीम

पुढारी वृत्तसेवा

जालना : बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि इतर कारणांमुळे वाढत असलेल्या असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान करण्यासाठी जालना जिल्ह्यात ३० वर्षांवरील १२ लाख ४२ हजार नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’अंतर्गत ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ हे अभियान १ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची अंमलबजावणी होणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी अभियानात सहभागी होणार आहेत.

अभियानात आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, नागरिकांची नोंदणी व आरोग्यविषयक माहिती संकलन, गावपातळीवरील प्राथमिक तपासणी, आरोग्यवर्धिनी केंद्रावरील तपासणी, तालुका व जिल्हास्तरीय तपासणी तसेच तृतीयस्तरीय आरोग्य सेवांचा समावेश आहे. ‘लक्षणे नसली तरी तपासणी करा’, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी केले आहे.

उच्च रक्तदाब, मधुमेह आणि काही कर्करोग सुरुवातीला लक्षणेविना असू शकतात. त्यामुळे ‘मला काही त्रास नाही’ असे न म्हणता ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील एकूण २२ लाख १८ हजार ८५३ लोकसंख्येपैकी १२ लाख ४२ हजार ५५८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती यांचा तपासणी पथकामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २४२६ मनुष्यबळ यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

असंसर्गजन्य आजारांवर विशेष लक्ष

उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांसारख्या आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार व व्यवस्थापन अधिक सुलभ होते. त्यामुळे ३० वर्षांवरील प्रत्येक महिला व पुरुषाची आरोग्यविषयक माहिती संकलित करून आवश्यक तपासण्या करण्यात येणार आहेत. संशयित किंवा आजाराचे निदान झालेल्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थेकडे संदर्भित केले जाणार आहे.

जालना जिल्ह्यामध्ये १ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीमध्ये मिशन मोडवर "तिशीचा पल्ला, तपासणी आणि सल्ला" हे शंभर दिवसांचे आरोग्य अभियान सात टप्प्यात राबविण्यात येत येत असून ३० वर्षा पुढील नागरिकांची मधुमेह, रक्तदाब, मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या असंसर्गजन्य रोगांची तपासणी करण्यात येईल. उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच काही प्रकारचे कर्करोग इ. रोगाची लक्षणे सुरुवातीला दिसून येत नाही. त्यामुळे मला काही त्रास नाही असे न म्हणता ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT