जाफराबाद : शहरातील सोमेश्वर महादेव मंदिर रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल व घाण साचत असल्याने भाविकांना मंदिरात दर्शनासाठी ये-जा करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे.  (छाया : मुकेश भारव्दाज)
जालना

Jafrabad Someshwar Mahadev Temple : सोमेश्वर मंदिर रस्त्यावर चिखल अन्‌ घाणीचे साम्राज्‍य

श्रावण महिन्यात भाविकांची गैरसोय; नालीचे पाणी रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

जाफराबाद : जाफराबाद शहरातील प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोमेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नालीचे घाण पाणी साचत असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. मात्र, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यातूनच भाविकांना वाट काढावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

शहरातील वाॅर्ड क्रमांक ३ मधील वसाहतीतील नालीचे सांडपाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून वाहत मंदिराच्या दिशेने येते. हे पाणी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचत आहे. परिणामी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पाणी आणि चिखलामुळे पायी तसेच वाहनाने येणाऱ्या भाविकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सोमेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी वास्तुशैलीचे प्राचीन मंदिर असून, जागृत देवस्थान म्हणून त्याची ख्याती आहे. जाफराबाद शहरासह संपूर्ण तालुक्यातून तसेच परगावातूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात भाविकांची संख्या वाढत असल्याने या समस्येची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.

नगरपंचायत प्रशासनाने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर योग्य ठिकाणी पाइप टाकून साचलेल्या सांडपाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावावी. तसेच रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवून रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

सोमेश्वर महादेव मंदिर हे जागृत देवस्थान असल्यामुळे जाफराबाद शहरासह संपूर्ण तालुक्यातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन घाण पाण्याची विल्हेवाट लावावी आणि रस्त्यावर मुरूम टाकून तो व्यवस्थित करून द्यावा. -
विश्वजीत गौतम, जाफराबाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT