जाफराबाद : पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करताना काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी.  pudhari photo
जालना

Jal Jeevan Mission pipeline dispute : जलजीवन मिशन योजनेचा वाद चिघळला

जाफराबाद पोलिस ठाण्यात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

जाफराबाद : तालुक्यातील कोल्हापूर शिवारात जलजीवन मिशनच्या पाईपलाईन कामावरून सुरू झालेला वाद आणखी चिघळला. संबंधित कंपनीविरोधात तक्रारी दाखल असूनही कारवाई न करता उलट सरपंच महिला व त्यांच्या पतीला अटक करण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थांनी जाफराबाद पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलजीवन मिशनअंतर्गत मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) कंपनीमार्फत कोल्हापूर शिवारात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान शेतकऱ्यांची संमती न घेता खासगी शेतात प्रवेश करून पिकांचे नुकसान करण्यात आल्याचा तसेच एका महिलेशी गैरवर्तन झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

याप्रकरणी कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात लेखी तक्रारही जाफराबाद पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र, कंपनीच्या व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सरपंच महिला व त्यांच्या पतीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करून तक्रारदारांनाच अटक केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

या घटनेनंतर काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शेतकरी जाफराबाद पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत कंपनीच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंच्या तक्रारींवर समान निकषांवर निष्पक्ष कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या संपूर्ण प्रकरणामुळे जलजीवन मिशनच्या कामकाजासह प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याऐवजी पोलिसांकडून एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे जाफराबाद पोलिसांविरोधातही संतापाची लाट उसळली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT