भोकरदन ( जालना ) : जाफराबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरपंचायत नगराध्यक्षा सुरेखा लहाने यांनी समर्थक नगरसेवकांसह भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील बंगल्यावर सोमवार (११) रोजी रात्री दाखल होत त्यांनी दानवे यांच्याशी बंद दाराआड सुमारे दोन तास चर्चा केल्याने त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत चर्चेला उधाण आले आहे.
मागील वर्षी खुद्द शरद पवार हे लहाने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यास आले होते.
जाफराबाद नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेसचे बहुमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या डॉ. सुरेखा लहाने या नगराध्यक्षा आहेत. मात्र त्यांच्याविरुद्ध भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेवक दीपक वाकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेसचे काही नगरसेवकांसह अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला. दीपक वाकडे हे १२ नगरसेवक घेउन सहलीवर गेले आहेत. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी नऊ तर तो पारित करण्यासाठी १२ नगरसेवकांची आवश्यकता आहे. हा विश्वास प्रस्ताव फेटाळण्यासाठी डॉक्टर लहाने यांना सहा नगरसेवकांची गरज आहे. मात्र त्यांच्याकडे सध्या पाच नगरसेवकांचे समर्थन आहे. भाजपाच्या एका नगर-सेवकाचा पाठिंबा त्यांना मिळविण्यासाठी सोमवार, दि. ११ रोजी ते रात्री आठ वाजेनंतर डॉ. सुरेखा लहाने त्यांचे पती डॉ. संजय लहाने यांच्यासह काही समर्थक नगरसेवकांसह भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी दाखल झाले होते.
पक्षप्रवेशाबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचे डॉक्टर संजय लहाने यांनी दैनिक पुढारी बोलताना सांगितले. मात्र या दानवे व लहाने यांच्या भेटीमुळे सर्वत्र लहाने यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा झाली.