जालना : अनाथ आणि गरजू बालकांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी जालन्यात काही संस्थाचालकांनी चक्क लाभार्थ्यांच्या पालकांकडे पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे. संतप्त पालकांनी जिल्हाधिकारी यांना गुरुवार, दि. २३ रोजी निवेदन सादर करून संस्थाचालकांवर कारवाईची मागणी केली आहे.
अनाथ लेकरांच्या मुखातील घास हिरावून घेणाऱ्या या संस्थाचालकांविरोधात जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत पालकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात १२ सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून ही योजना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत राबवली जाते. यात सेवाभावी संस्थांना (एनजीओ) समन्वयाची जबाबदारी दिलेली आहे. मात्र, या संस्था अनाथांचा लाभ मिळवून देण्यासाठी थेट पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप करण्यात आला. निवेदनावर पालक वर्षा घोडे, काजल राजपूत, पूजा राजपूत, फौजिया पठाण, अंबिका जाधव, कांचन टाकसार, सुवर्णा कानडे आदींच्या सह्या आहेत.
पात्र बालकाचा सांभाळ करणाऱ्या पालकाला किंवा नातेवाईकाला प्रति बालक दरमहा ठराविक रक्कम (सध्या २२५० रुपये) आर्थिक सहाय्य दिले जाते. बालकाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असावे लागते. अनाथ बालकांव्यतिरिक्त, ज्यांचे पालक तुरुंगात आहेत किंवा ज्यांचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे, अशा बालकांनाही लाभ मिळतो.
चौकशीअंती निर्णय या संदर्भात तक्रार आलेली आहे. येत्या चार दिवसांत चौकशी करून निर्णय देण्यात येईल. दोषी असणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात येईल.- आर. व्ही. कड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी.