Interest on security deposit by Mahavitaran to electricity consumers
जालना, पुढारी वृत्तसेवा : महावितरणकडे जमा असलेल्या वीजबिलांच्या सुरक्षा ठेवीवर जालना मंडलातील २ लाख ४ हजार ३०७ ग्राहकांना २ कोटी ८ लाख व्याज परतावा देण्यात आला आहे. ही रकम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे.
महावितरणकडे जमा असलेल्या वीजबिलांच्या सुरक्षा ठेवीवर २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जालना मंडळातील २ लाख ४ हजार ३०७ ग्राहकांना २ कोटी ८ लाख व्याज देण्यात आले आहे. सुरक्षा ठेव म्हणजे काय? दरवर्षी ती का घेतली जाते? त्यावर व्याज मिळते का? असे विविध प्रश्न सामान्य वीजग्राहकाला नेहमीच पडतात.
मुळात महिनाभर वीज वापरल्यानंतर ग्राहकांना महावितरण वीजबिल देते. ते भरण्यासाठी २१ दिवसांची मुदत देते. मुदत संपल्यानंतरही बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यासाठी १५ दिवसांची नोटीस देते. हा सर्व कालावधी दोन महिन्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार हमी म्हणून ग्राहकांकडून मागील वार्षिक वीजवापराच्या सरासरी दुप्पट तसेच त्रैमासिक बिलिंग असलेल्या ग्राहकांची सुरक्षा ठेव दीडपट करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
महावितरण वर्षातून एकदा वीजवापराच्या अनुषंगाने सुरक्षा ठेवीचे पुनर्निधारण करू शकते. एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील दोन महिन्याच्या सरासरी रकमेपेक्षा कमी असेल तर संबंधित ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले जाते.
ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीजदर आणि वीजवापर यामुळे वीजबिलाची रक्कम वाढली असेल तरच त्यातील फरकाच्या रकमेचे बिल म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल जाते. ज्या ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा महावितरणकडे भरणा केला नसेल त्यांची ती थकबाकी सुरक्षा ठेवीतील व्याजामधून वळती करण्यात येते. ग्राहकांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या दराप्रमाणे व्याज देण्यात येते.
महावितरणकडे जमा अस-लेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करताना ही ठेव ग्राहकाला व्याजासह परत केली जाते. यामुळे ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा वेळीच भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.