Jalna News : जालन्यात गुन्हेगारीचा वाढता ग्राफ; शिष्टमंडळाची एसपींकडे धाव  File Photo
जालना

Jalna News : जालन्यात गुन्हेगारीचा वाढता ग्राफ; शिष्टमंडळाची एसपींकडे धाव

व्यापारीवर्गात भीतीचे सावट पसरले, रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Increasing crime graph in Jalna; Delegation meets SP

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरात गुन्हेगारीचा चेहरा दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. खून, चोरी, दरोडे, मारहाण, उद्योजकांना धमक्या, वाहनचोरी अशा घटनांनी व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, शहरात पुन्हा सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी जालना शहरातील लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांच्या शिष्टमंडळाने सोमवार दि. २७ रोजी पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

दिलेल्या निवेदनात जालना शहर व जिल्ह्यातील नागरिकांच्या वाढत्या असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. मागील काही दिवसांपासून शहरात तसेच ग्रामीण भागात गुंडगिरी, चोरी, धमकावणे, व विनाकारण मारामाऱ्या अशा अनेक घटना घडत आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

रात्री उशिराच्या वेळेस रस्त्यावर बेकायदेशीरपणे फिरणारे संशयास्पद युवक, दुकानदारांना, व्यापारी वर्गाला, उद्योजकांना धमक्या देणे, खंडणी मागणे व त्यांच्यावर जीवघेणे हल्ला करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जालना शहरात प्रत्येक पंधरा दिवस ते महिन्याभरातून एखादी खुनाची घटना नियमितपणे घडत आहे. या घटनांसाठी सर्रासपणे जीवघेणे शस्त्र व बंदुकींचा वापर केला जात आहे अशी शस्त्रे कुणाकडून व कशी उपलब्ध होतात या बाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याची गरज आहे.

अशा घटना थांबविण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलणे अत्यावश्यक आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक व्यापारी व शेतकऱ्यांना धमकावून वेळप्रसंगी जीवघेणा हल्ला करून लुटमार करतात. मोंढ्यात एक पोलीस चौकी उभारण्यासाठी मागील १० ते १२ वर्षांपासून मागणी आहे.. परंतु यावरती आजपर्यंत कोणत्याही स्वरुपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यावर करवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या शिष्टमंडळात खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार संतोष सांबरे, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिव सेनेचे उबाठा जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर, बबलू चौधरी, अतिक खान, रशिद पहिलवान, बदर चाऊस, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत सहानी, संजय मुथा, विष्णू पाचफुले, कृष्णा पडूळ, सोपान तिरुखे व इतर व्यापारी आदींचा समावेश होता. यावेळी पोलीस अधिक्षक अजय बन्सल यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आश्वासन दिले.

या आहेत मागण्या

१. जालना शहर व जिल्ह्यात पोलिस गस्त व नाकाबंदी वाढवावी.

२. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्यावर कठोर कलमे लावावीत.

३. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यक्षमता तपासून नियमितपणे निरीक्षण करावे.

४. पोलिस पेट्रोलिंग वाहनांची संख्या वाढवून रात्रीच्या वेळी संवेदनशील भागात तैनाती करावी.

५. नागरिकांसाठी "हेल्पलाइन" सक्रिय ठेवून तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT