Increased infestation of worms in maize crop
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात जवळपास साडेतीनशे हेक्टर क्षेत्रावरील मकाची लागवड करण्यात आली आहे. या मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मकाचे पीक धोक्यात आले आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
पिंपळगाव रेणुकाई परिसरात मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने तलाव, विहिरीसह सिंचन प्रकल्पात चांगला पाणीसाठा उपलब्ध होता. परतीच्या पावसामुळे खरिपात मका पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे रब्बीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मकाची लागवड केली.
चांगले पाणी असल्याने मक्काचे पीक बहरले. मात्र अळीचा प्रादुर्भाव झाल्याने जोमात असलेली मका कोमात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगत आहेत. अळीचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी शेतकरी महागामोलाच्या औषधांची फवारणी करीत आहेत. मात्र अळीचा बिमोड होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
खरीप हंगामापाठोपाठ पिंपळगाव रेणुकाई शेकडो हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या मकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक धोक्यात आले. यावर मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
अळीचा बिमोड करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करावी. प्रत्यक्ष नुकसानीची माहिती घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.
कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास साडेतीनशे हेक्टरवरील मकाचे पीक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मार्गदर्शन करावे.