In the wake of drought, the district is facing a serious crisis of water scarcity
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यात यावर्षी पावसाने मोठा खंड दिल्याने पाणीटंचाईचे सावट गंभीर रूप घेण्याची शक्यता आहे. ७ मध्यम व ६० लघु प्रकल्पात केवळ ११ टक्के जलसाठा असल्याने आगामी काही महिन्यात दुष्काळाची दाहकता वाढणार आहे.
जालना जिल्ह्यात गतवर्षी १ जुन ते १ आक्टोंबर २०२६ या कालावधीत ८३७ मिमी पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्याची वार्षीक सरासरी ६०३ मिमी असताना जिल्ह्यात १ आक्टोंबर पर्यंत केवळ ४९० मिमी पाऊस् पडला आहे. वार्षिक सरासरीच्या हा पाऊस् ६५ टक्के आहे. सरासरीच्या तुलनेत २५ टक्के पाऊस कमी असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्याची पावसाची सरासरी केवळ ७४.४ टक्के इतकीच झाली असून, अपेक्षित पावसाच्या तुलनेत सुमारे २५.६ टक्के तूट आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ८३७.६ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा पावसात मोठी घट झाली आहे.
तालुकानिहाय परिस्थिती पाहता घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक तूट दिसून येत असून, तेथे अपेक्षित ६४०.९ मिमीच्या तुलनेत केवळ ३९१.१ मिमी पाऊस झाला आहे. अंबडमध्ये ३८४.३ मिमी, बदनापूरमध्ये ४५०.१ मिमी, परतूरमध्ये ४५६.१ मिमी, जाफराबादमध्ये ४६५.४ मिमी, मंठा येथे ४८२.४ मिमी आणि भोकरदनमध्ये ४८४.३ मिमी पाऊस नोंदला गेला आहे.
यंदाच्या पावसाची ही तूट आगामी उन्हाळ्याच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरत आहे. पावसाळा संपत असताना जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण न झाल्यास ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन आणि संभाव्य टंचाईग्रस्त भागांसाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या टंचाईमुळे जिल्हा प्रशासनाला सद्यपरिस्थितीत संभाव्य टंचाईग्रस्त गावात पाण्याचे जलसाठे आरक्षित करून जिल्हा प्रशासनाल तातडीच्या उपाययोजना लागणार आहे.
पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर
अंबड तालुक्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ६४.४ टक्के, तर घनसावंगीत ६१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.