Illegal Tree Felling: Forest Officials' Negligence
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अवैध वृक्षतोडीला खतपाणी घालणाऱ्या संबंधित वन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी मातंग मुक्ती सेनेच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर मंगळवार, दि. २४ रोजीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण वन परिक्षेत्रातील मौल्यवान झाडांची मोठ्या प्रमाणावर बेसुमार कत्तल होत आहे. ही वृक्षतोड अवैध पद्धतीने सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डची तपासणी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे वन विभागात खळबळ उडाली असून प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.
कारवाई करू उपोषणकर्त्यांच्या मागण्यांनुसार चौकशी केली जाईल. कुठे अवैध वृक्षतोड सुरू असल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. नेमकी ठिकाणे कळविल्यास संबंधित ठिकाणी तत्काळ पथक पाठवले जाईल.- सुदाम मुंढे, सहायक वन संरक्षक, जालना
लाकूडमाफिया आणि वन विभागातील काही अधिकारी-कर्मचारी यांच्यात आर्थिक हितसंबंध निर्माण झाले आहे. संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षक जाणीवपूर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे. याची चौकशी करण्यात यावी.विष्णू गोफणे, जिल्हाध्यक्ष, मातंग मुक्ती सेना.