परतूर ः परतूर तालुक्यातील सिंगोना शिवारात शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गावरील आष्टी रोडलगत अवैध मुरूम खोदला जात असल्याने दिंडी मार्गाचे संरक्षण कठडे खचल्याने धोक्यात आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तीर्थक्षेत्र शेगाव ते पंढरपूर या पालखी मार्गावरील परतूर-आष्टी रोडवर सिंगोना शिवारात रस्ते विकास महामंडळाच्या नियमांना हरताळ फासण्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या जमिनीवर एका खासगी व्यक्तीने प्लॉटिंग पाडली असून, या प्लॉटमध्ये भराव टाकण्यासाठी चक्क मुख्य रस्त्याच्या कडेचा मुरूम खरवडून काढला जात आहे.
या बेजबाबदार कृत्यामुळे रस्त्याच्या कडेला लावलेले लोखंडी संरक्षण कठडे खचल्याने आता अधांतरी झाले आहेत. रस्त्या लगत मुरूम खोदल्यामुळे पावसाळ्यात रस्ता खचून मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या या मार्गावर सिमेंट रस्ते बांधणीचे काम पूर्ण झाले असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वळणावर आणि उंच भागात लोखंडी कठडे बसवण्यात आले आहेत. मात्र, सिंगोना शिवारात नवीन प्लॉटिंग पाडणाऱ्या संबंधित व्यक्तीने स्वतःचा आर्थिक फायदा पाहण्यासाठी चक्क रस्त्याच्या पायालाच सुरुंग लावला आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेचा खोलवर मुरूम काढून तो प्लॉटमध्ये पांगवण्यात आला आहे. संरक्षण कठड्यांच्या खांबांखालील माती व मुरूम खचल्याने कठडे कमकुवत झाले आहेत.